•   Tuesday, 30 Apr, 2024

'वृत्तपत्र' हे आधुनिक लोकशाही व्यवस्थेत श्रेयस्कर सरकारचा मूलभूत आधार आहे.

Generic placeholder image
  

'वृत्तपत्र' हे आधुनिक लोकशाही व्यवस्थेत श्रेयस्कर सरकारचा मूलभूत आधार आहे. ते लोक-शिक्षणाचे एक महत्वपूर्ण साधन आहे.

[A newspaper in a modern democratic system is a fundamental basis of a good government. It is the one means of educating the people. Dr. Amedkar (Ref. People's Herald, dated 10th January, 1945)

सर्व प्रथम संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीय जनतेस हार्दिक शुभेच्छा !!! राष्ट्रनिर्माण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष व द ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर अत्यंत यशस्वी राजकारण केले. स्वतंत्र मजूर पक्षाचा, पहिल्याच  निवडणुकीचा जाहीरनामा, राष्ट्रनिर्माण प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करतो. बाबासाहेबांच्या राजकीय यशामागे (अनेक कारणांपैकी) प्रमुख तीन कारणे आहेत. संसदीय लोकशाहीत; कोणत्याही सामाजिक, राजकीय संघटनेची; यशस्वी वाटचाल होण्यासाठी; ज्या अनेक बाबी आवश्यक असतात, त्या विषयी आपण 'जनतेचे राज्य-राष्ट्र' या माध्यमातून वेळोवेळी माहिती घेणारच आहोत. या सर्व गोष्टीपैकी स्वतःचे संस्थात्मक, सुसंगठीत, एकात्मिक, अत्याधुनिक प्रसार-माध्यम व्यवस्था विकसित करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

            बाबासाहेबांनी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०)प्रबुद्ध भारत (१९५६) इ. वृत्तपत्रांची निर्मिती केली हे आपण जाणतो. परंतु राजकीय पक्ष संघटनेचे महत्त्वाचे अखिल भारतीय अंग म्हणून "People's Herald" या इंग्रजी साप्ताहिका विषयी आपणास विशेष माहिती नाही. त्यासाठी 'जनतेचे राज्य-राष्ट्र' या माध्यमातून ही माहिती सविनय प्रसारित करत आहोत. या साप्ताहिकाचे काही अंक, मुळ इंग्रजी वा भाषांतरित लेख, इतर माहिती इ. कुणाकडे उपलब्ध असल्यास पुढील उपयुक्त संशोधनासाठी ‘जनतेचे राज्य-राष्ट्र’ कडे पाठवावी ही विनंती.  

हे साप्ताहिक बाबासाहेबांच्या मार्गदर्शनात बंगाल प्रांतातील त्यांचे सहकारी चालवित होते. संपादक म्हणून सन्माननीय पी. सी. डे यांनी जबाबदारी स्वीकारली होती. या वृत्तपत्राचे ३ जानेवारी १९४५ ला बाबासाहेबांच्या हस्ते, मोठया समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले होते. कार्यालयीन पत्ता: १-२ सीताराम घोष मार्ग, कलकत्ता येथून हे वृत्तपत्र प्रकाशित होत असे. त्याचवेळी हे साप्ताहिक सुरू करण्यामागची कारणमिमांसा सुस्पष्ट केलेली होती. "People's Herald" या साप्ताहिकाचा, लवकरच उदयास येणाऱ्या नवभारतात होणारा प्रकाशन उद्देश अशा प्रकारे स्पष्ट करण्यात आला होता की, हे वृत्तपत्र समाजाच्या भावना, विधिसंगत आकांशा, तक्रारी व मागण्या यावर आवाज उठवण्यासाठी तसेच भारतासमोरील वर्तमान समस्या आणि भविष्यातील भारतीय राज्यांची संरचना; याकडे पाहण्याची दृष्टी विकसित करणे इ. कारणांमुळे आपल्या राजकीय पक्ष संघटनेचे अखिल भारतीय अंग म्हणून सुरु करण्यात आले. [Ref.  People's Herald, dated 10th January, 1945, Dr. Babasaheb Ambedkar Writings and speeches Vol. 17, part 3, page 346] डॉ बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतातील खुलना व जस्सोर या मतदारसंघातून; काँग्रेसने त्यांच्या विरोधात सर्व षडयंत्र करून देखील; संविधान सभेवर मोठ्या मताधिक्याने निवडून गेले होते. बाबासाहेबांनी लढविलेल्या या अतिमहत्वाच्या निवडणूकीतील यशात या वृत्तपत्राची खुप महत्वाची भूमिका आहे.

बाबासाहेबांनी People's Heralds च्या उद्घाटन प्रसंगी सल्ला दिला होता की, वृत्तपत्राने मतदारांना केवळ शिक्षित करणेच नव्हे तर मतदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी मतदारांप्रती कसे समर्पित होते, तसेच त्यांनी त्यांचे कर्तव्य व्यवस्थितपणे बजावले की नाही व कुठलेही गैरवर्तन केले नाही हे पहावे. जर People's Heralds हे वर्तमानपत्र आपल्या जागेचा काही भाग; विविध विधिमंडळातील आपल्या सदस्यांचे वर्तन लोकांना सांगण्यासाठी, त्यांनी सभागृहात हे का केले वा त्यांनी ते का केले नाही याचे वार्तांकन करण्यासाठी देऊ केले तर आपल्या विधानसभा सदस्यांच्या वर्तनामध्ये मोठया सुधारणा होतील याबद्दल माझ्या मनात संकोच नाही. तसेच त्यामुळे आपल्या समाजाला कलंक आणणारी सद्याची बजबजपुरी थांबेल. जे आपल्या राजकीय जीवनात चुकीच्या मार्गाने गेले आहेत त्यांचे परिमार्जन करण्यासाठी एक मोठे साधन म्हणून मी हा पेपर पहात आहे. [संदर्भ: डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १७ , भाग ३, पृष्ठ ३४८ ] 

People's Heralds संदर्भात वृत्तपत्राचे महत्त्व विशद करताना बाबासाहेब सांगतात की, "सध्याच्या युगात वर्तमानपत्राचे अत्यंत महत्त्व आहे. आपापल्या पक्षांचा प्रचार करण्याकरिता इतर पक्ष हजारो रुपये खर्च करून वर्तमानपत्रे चालवितात. जनतेपुढे आपली  राजकीय आणि नैतिक बाजू मांडण्यासाठी व त्याचप्रमाणे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या कार्याची माहिती देण्यासाठी वर्तमानपत्रांची आवश्यकता आहे. आपल्या चळवळीचा दृष्टिकोन मांडण्याकरिता आज आपणास प्रांतोप्रांती अनेक वर्तमानपत्रे पाहिजे आहेत." [संदर्भ:   डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८ , भाग २, पृष्ठ ४८६ ]  

जय संविधान !!!